नवी दिल्ली - आजचा पाकिस्तान हा 'नया पाकिस्तान' 'नयी सोच का पाकिस्तान' असल्याचा दावा करणाऱ्या पाकमधील राजकीय नेत्यांची भारतीय परराष्ट्र खात्यानं शेलक्या शब्दांत कानउघाडणी केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अनेकदा पाकिस्तानचा खोटरडेपणा उघडा पडला आहे. तर, भारताचे दोन विमानं पाडल्याचा पाकचा दावाही खोटा असल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले.
नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. तसेच नया पाकिस्तान म्हणणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना फटकारलं. नया पाकिस्तान म्हणता, मग दहशतवाद्यांवर नयी अॅक्शन घ्या, असे भारताने सुनावले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताची दोन विमाने पाडल्याचे सांगण्यात येते, मग पाक त्याचे पुरावे का देत नाही ? कुठंय ते व्हिडीओ रेकॉर्डींग, कुठंय त्याची सत्यता, असा प्रश्न रवीश कुमार यांनी पाकिस्तानला विचारला आहे. भारताने पाकिस्तानचे विमान पाडले अन त्याचे पुरावेही दिले. तर, पाकिस्तानकडून भारताचे दोन विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, भारताचे मिग 21 हे एकच विमान पाडण्यात आले आहे. जर, दुसरे विमान पाडण्यात आले असेल, तर ते कुठंय, त्याचे पुरावे पाकिस्तान का देत नाही. पाकिस्तान नेहमीप्रमाणे खोटं बोलतोय, असेही भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी म्हटले. पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्राकडूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून पाकिस्तानाल जैश ए मोहम्मद संघटनेवर कडक कारवाई करण्याचे बजावण्यात आल्याचे रविश कुमार यांनी सांगितले.
पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखं वागतंय...
भारतानं एफ-१६ पाडलं... त्याचे पुरावेही दिलेत, त्यावर पाकिस्तान काहीच का बोलत नाही? मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांचे परराष्ट्र मंत्री मान्य करतात, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशनं स्वीकारली आहे, हे पाकिस्तान का विसरतंय, असेही भारताने म्हटले आहे.