नवी दिल्ली - काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडलेला पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. पाकिस्ताननेभारतासाठी स्वतः ची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तानने ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे. हवाई हद्द बंद केल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.
'पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारताने देखील समुद्र मार्ग बंद करावा' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच भारताने अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असा सल्ला देखील दिला आहे. सुब्रमण्यम यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत सल्ला दिला आहे.
'नमो सरकारला माझा सल्ला आहे की, भारतीय विमानांसाठी जर पाकिस्तान त्यांची हवाई हद्द बंद करू शकतं तर भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. याआधी काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहे आणि त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय वायू सेनेला दिलेली परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानमधून अफगाणिस्तान येथे जाण्यास पाकिस्तान सरकारनं भारतीय एअर कंपन्यांना मज्जाव केला आहे.
पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच सुरुवात मोदींनी केली होती, आता शेवट आम्ही करणार, असेही चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. भारतासाठी पाकिस्तानचे तात्पुरत्या स्वरूपात एअरस्पेस बंद केला आहे. तसेच भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील व्यापारी संबंधांनाही आळा घालण्याचा डाव पाकिस्तान सरकारचा आहे. इम्रान यांच्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. कलम 370 हटविल्यानंतर लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. भारत सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानचा तिळपापड झाला असून पंतप्रधान इम्रान खानसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत.