उधमपूर, दि. ७ - सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये घट न झाल्याने संतप्त झालेल्या भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. वारंवार सांगूनही पाकिस्तान सुधरत नसेल तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केली जाईल, असा रोखठोक इशारा लष्कराच्या नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडर इन चार्ज लेफ्टनंट जनरल ऑफिसर देवराज अन्बू यांनी दिला आहे. उधमपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देवराज म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक करून आम्ही हे दाखवून दिले आहे की नियंत्रण रेषा ही अशी रेषा नाही जी पार करता येणार नाही. आम्हाला वाटेल तेव्हा नियंत्रण रेषा ओलांडण्यास आम्ही सक्षम आहोत. गरज पडली तर आम्ही सीमा पार करू आणि हल्लाही करू." दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्या प्रकरणी फुटीरतावादी नेत्यांवर झालेल्या कारवाईंनंतर काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मीरमधील पाक पुरस्कृत दहशतवादाबाबत माहिती देताना ते म्हणले की, "नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांमध्ये दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स आणि दहशतवादी तळांमध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यांची संख्या घटलेली नाही." गत वर्षी सप्टेंबर महिन्यात नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या आठ जवानांना आज नॉर्दन कमांडमध्ये शौर्य चक्र देऊन गौरविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. नियंत्रण रेषेवरील सध्याच्या परिस्थितीबाबत त्यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत. पण यातील अनेक प्रयत्न हाणून पाडले गेले. तसेच घुसखोरीच्या घटना कठोरपणे मोडून काढण्यात येत आहेत. तसेच लेहमधील परिस्थितीही नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उत्तरेकडील सीमेवर संघर्ष उदभवल्यास पश्चिमेकडील शत्रू देश त्याचा गैरफायदा उठवू शकतो, असे होण्याची शक्यता अधिक आहे, असा सावधगिरीचा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी बुधवारी दिला होता. राजधानी नवी दिल्लीत आयोजित भविष्यातील युद्ध या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले होते. यावेळी भारत हा दोन विरोधी देशांनी घेरलेला आहे, असे त्यांनी सांगितले. रावत म्हणाले, सीमेवर भारताचे दोन शत्रू आहेत. त्यातील उत्तर सीमेवरील देश म्हणजे चीन आणि पश्चिम सीमेवरील देश म्हणजे पाकिस्तान. त्यातील पश्चिम सीमेवरील शत्रूचा विचार केल्यास आम्हाला त्याच्यासोबत कुठल्याही वाटाघाटींची शक्यता वाटत नाही. कारण भारत त्यांची फाळणी करू पाहतोय, असे तेथील राजकारणी, जनता आणि सैन्याला पढवण्यात आले आहे. त्यांनी आपल्यासोबत छद्म युद्ध पुकारलेले आहे. आता आपला देश कधीपर्यंत हे सर्व सहन करेल आणि कधी सहनशक्तीचा अंत होऊन युद्धाला तोंड फुटेल याबाबत काही सांगता येत नाही." त्याबरोबरच उत्तर सीमेवरही युद्धजन्य परिस्थितीसाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तान सुधरला नाही तर पुन्हा सर्जिकल करू - लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 4:54 PM