"PM गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?", हार्दिक पटेल यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:12 PM2022-05-19T18:12:59+5:302022-05-19T18:59:47+5:30
Hardik Patel : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर गुजरातचे असतील तर त्यांचा राग उद्योगपती अदानी, अंबानींवर का काढता? सवाल करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता हार्दिक पटेल कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांनी स्वत: अद्याप कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना, गुजरातमध्ये पुढची २० वर्षे काँग्रेस जिंकू शकणार नाही, असे हार्दिक पटेल म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर गुजरातचे असतील तर त्यांचा राग उद्योगपती अदानी, अंबानींवर का काढता? सवाल करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, उद्योजकांना केंद्रातील मोदी सरकारकडून जास्त महत्त्व दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. यावर हार्दिक पटेल म्हणाले, "उद्योगपती स्वतःच्या मेहनतीने बनतो, जर उद्योगपतीने कष्ट केले तर सरकार त्याला मदत करत आहे असा कलंक आपण लावू शकत नाही. तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर अदानी, अंबानी यांना दोष देऊ शकत नाही. पंतप्रधान गुजरातचे आहेत म्हणून तुम्ही त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?" असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला.
याचबरोबर, "काँग्रेस पक्षाची अवस्था फारशी चांगली नसताना पक्षातील मोठ्या पदावरील महत्त्वाची नेतेमंडळी परदेशात पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. त्यांना फक्त एसी रूममध्ये बसून चिकन सँडविच खाण्यातच रस असतो. राहुल गांधींना मी अनेकदा विनंती करूनही मला काँग्रेसमध्ये फारशी महत्त्वाची भूमिका देण्यात आली नाही. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की गुजरातमध्ये पुढची २० वर्षे काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही", अशा शब्दांत सुद्धा हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
A businessman rises due to his or her own hard work. You can't abuse Adani or Ambani every time. If PM is from Gujarat, then why take out your anger about this on Ambani & Adani? This was just a way to mislead people: Hardik Patel on Congress targeting Adani and Ambani
— ANI (@ANI) May 19, 2022
दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता हार्दिक पटेल कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर काँग्रेस सोडण्याचा निर्णय मी स्वत:च्या मर्जीने घेतला. पण दुसऱ्या कोणत्या पक्षाच जायचे, याचा मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. जेव्हा मी याबद्दल निर्णय घेईन. त्यावेळी नक्कीच त्या संदर्भात घोषणा करेन, असे हार्दिक पटेल म्हणाले.