कोट्टयम : काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार केरळमध्ये आल्यास किमान उत्पन्न योजना (न्याय योजना) राबवून पारखली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील जनतेला दिले. न्याय योजना यशस्वी होईल, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.
पुथूपल्ली विधानसभा मतदारसंघातील मनारकाड येथील एका नाक्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओम्मेन चंडी यांनी ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी उघड्या वाहनात होते. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही होते. न्याय योजनेंतर्गत वार्षिक ७२,००० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. पुढे काय होणार आहे, हे आम्ही जाणून आहोत. हा नवीन विचार आम्ही पारखून पाहणार आहोत. ही योजना गरिबीचा शेवट करणारी ऐतिहासिक योजना असल्याचे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते.
केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल. गरिबीशी कसा लढा द्यावा, हे केरळ उर्वरित देशाला दाखविणार आहे, असेही ते म्हणाले. या आधी जाहीरसभेत राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आल्यास निर्धारित दिवसांत न्याय योजना सुरू करणार आहोत. नोटाबंदी, कोविड-१९ ची साथ आणि जीएसटीच्या सदोष अंमलबजावणीमुळे ढासळलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.