मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 01:43 PM2018-08-09T13:43:57+5:302018-08-09T13:44:25+5:30

अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला मदतच झाली आहे.

"If Rahul Gandhi can hug Narendra Modi, why cannot he ask Arvind Kejriwal for support to his party's candidate?-AAP | मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

Next

नवी दिल्ली- राज्यसभेत उपाध्यक्षांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकार एक परिक्षाच पास झाले आहे असे म्हणावे लागेल. या निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या एकजुटीमध्ये मात्र काही त्रूटी असल्याचे दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोन केला नाही म्हणून आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी अनुपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला ही निवडणूक आणखी सोपी गेली. 

 राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारु शकतात तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना (मतदान करण्याची विनंती करणारा) फोन का करु शकत नाहीत?असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंग यांनी विचारला आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी नितिशकुमार प्रयत्न करतात तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी राहुल का प्रयत्न करत नाहीत? आम्ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसची मदत केली मात्र साधे आभारही मानले गेले नाहीत अशी खंत संजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.



 2014 साली केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अनेकदा नामुष्कीजनक ठरावांना, दुरुस्त्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावातही विरोधकांनी मांडलेल्या दुरुस्त्यांना केवळ बहुमत नसल्यामुळे मान्य करावे लागले.  आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे असे दिसून येते. राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले असले तरी अनेक महत्त्वाच्या निर्णयांबाबतीत, ठरावांसाठी मित्रपक्षांना आणि कधीकधी विरोधकांनाही विनंती करावी लागते. उपाध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची चिन्हे मावळल्यावर भारतीय जनता पार्टीला मित्रपक्षांमधील उमेदवार शोधणे भाग पडले. बिजू जनता दलाला आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्या सदस्यांपैकीही चाचपणी करुन झाली. तसेच अकाली दलाच्या गुजराल यांचे नाव पुढे करुनही त्यावर चर्चा करण्यात आली. शेवटी आता मित्रपक्षांमध्ये संबंध सर्वात जास्त ताणल्या गेलेल्या जनता दल युनायटेडच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


जदयु उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारा फोन पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांना केला तर शेवटच्या दोन दिवसांमध्ये अकाली दल व शिवसेना यांचाही पाठिंबा त्यांनी मिळवला. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना या मतदानामध्ये भाग घेणार नाही अशीही चर्चा होती.
244 खासदारांच्या राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 होता. मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तो 119 वरती आला. केजरीवालांच्या आपसब वायएसआर काँग्रेस, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्षाचे सदस्यही उपस्थित राहिले नाहीत.
विरोधकांच्या गोटामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, सनाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम पक्ष यांचा समावेश होता.

Web Title: "If Rahul Gandhi can hug Narendra Modi, why cannot he ask Arvind Kejriwal for support to his party's candidate?-AAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.