नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयांमुळे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचं उमेदवार समजलं जातं आहे. असं असेल तर मग महाआघाडीची गरजच काय?, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी लगावला. सध्या द्रमुकचे स्टॅलिन वगळता कोणीही महाआघाडीचे प्रमुख नेते म्हणून राहुल गांधीचं नाव पुढे करताना दिसत नाही. महाआघाडीतील 6 नेत्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये राम माधव यांनी महाआघाडीवर भाष्य केलं. राम माधव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलताना नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा संदर्भ दिला. 'राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख आहेत. त्यांचं नेतृत्त्व पक्षासाठी योग्य आहे की नाही, हे त्यांनी ठरवावं. त्यांचं नेतृत्त्व काँग्रेससाठी चांगलं आहे की नाही, यावर आम्ही कसं बोलणार? त्यांच्या नेतृत्त्वाची झलक गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसली. त्यामध्ये काँग्रेसला विजय मिळाला,' असं राम माधव म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी भाजपाची साथ सोडली, त्यावरही माधव यांनी भाष्य केलं. 'आघाडी किंवा युतीच्या राजकारणात तडजोडी करावी लागते. त्यासाठी भाजपा तयार आहेत. कुशवाह यांच्यासारख्या नेत्यांनी आमची साथ सोडली. मात्र आम्ही नवे मित्र शोधत आहोत. दक्षिण आणि पूर्व भारतात नव्या मित्रपक्षांचा शोध सुरू आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.