उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शुक्रवारी कांवड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी राज्यभरातील कांवड यात्रा मार्गांवरील सर्व फळांची दुकाने, भोजनालये, उपाहारगृहे यांना मालकांच्या नावाची ‘नेम प्लेट’ लावण्याचे आदेश दिले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. हे बाजपचे सांप्रदायिक आणि फुटिरतावादी राजकारण असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर, इतर धर्मियांप्रमाणे, हिंदूंनाही त्यांच्या श्रद्धेचे पावित्र राखण्याचा अधिकार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता योग गुरू बाबा रामदेव यांनीही भाष्य केले आहे.
बाबा रामदेव म्हणाले, "रामदेवाला त्याची ओळख सांगण्यात काही अडचण नसेल तर रहमानला त्यांची ओळख सांगण्यात का असावी? प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान वाटतो. नाव लपवण्याची आवश्यकता नाही, कामात शुद्धता हवी बास." उत्तर प्रदेश सरकारने, हलाल सर्टिफिकेशन असलेली उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर, उत्तराखंड सरकारनेही यात्रेकरूंच्या सुविधेसाठी कांवड यात्रा मार्गावरील सर्व फळांची दुकाने आणि भोजनालयांच्या मालकांना आपल्या नावाची नेमप्लेट लवण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच, असे न करणाऱ्या विरोधात कठोर कडक कारवाई केली जाईल, असे उत्तराखंड पोलिसांनी म्हटले आहे.
असा निर्णय सर्वप्रथम मुझफ्फरनगरमध्ये घेण्यात आला होता. येथे जिल्हा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण होऊ नये, म्हणून कांवड यात्रा मार्गावरील सर्व फळांच्या दुकानांना आणि भोजनालयांना आपल्या मालकांची नावे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले होते.
विरोधकांचा विरोध -या निर्णयानंतर, ही राज्य सरकारद्वारे प्रायोजित 'कट्टरता' आणि 'मुस्लीम' दुकानदारांना लक्ष्य करणारी कारवाई असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव राज्य सरकारवर टीका करत म्हटले, 'असा आदेश म्हणजे सामाजिक गुन्हा आहे. शांततापूर्ण वातावरण खराब करण्याची सरकारची इच्छा आहे.'
भाजप नेत्यांकडून निर्णयाचा बचाव -या निर्णयाचा भाजपच्या अनेक नेत्यांनी बचावही केला आहे. यांपैकी यूपीचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, "काही मुस्लीम दुकानदार, हिंदू नावांच्या आडून यात्रेकरूंना नॉन व्हेज खाद्य पदार्थांची विक्री करतात. ते वैष्णो ढाबा भंडार, शाकुंभरी देवी भोजनालय आणि शुद्ध भोजनालयासारखी नावे लिहितात आणि मांसाहारी भोजन विकतात."