नवी दिल्ली - देशातील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देश हादरला होता. मात्र, अद्यापही बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. वर्तमानपत्रात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. त्यातच, काही राजकीय आणि जबाबदार व्यक्तींकडून केली जाणारी वक्तव्येही लाजीरवाणी असतात. कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी रेपबाबत केलेल्या विधानाची माफी मागितली आहे. मात्र, सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
रमेश कुमार यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यासोबतच, त्यांच्या या विधानावर सभागृहात हसणाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजप नेत्यांकडूनही या आमदारावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रमेश कुमार यांनी कर्नाटक विधानसभेत बोलताना म्हटले की, 'देखिए, एक कहावत है- 'जब बलात्कार होना ही है, तो लेटो और मजे लो।. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या विधानावरुन कारवाई करण्याऐवजी हसून दाद दिली. त्यामुळे, कुमार यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांनी आणि नेटीझन्सने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सोशल मीडिया आणि भाजप नेत्यांनी या वक्तव्यावरुन त्यांना चांगलंच फटकारलं असून कारवाईची मागणी जोर धरत आहे. त्यामुळेच, रमेश कुमार यांनी विवादित विधानावरुन आज विधानसभेत माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील, तर माफी मागण्यास मला काहीही गैर वाटत नाही. मी मनाच्या अंत:करणापासून माफी मागतो, असे कुमार यांनी म्हटले. दरम्यान, कुमार यांनी माफी मागितल्यानंतर विधासभा अध्यक्ष हगडे यांनीही हे प्रकरण आता वाढवू नये, त्यांनी माफी मागितली आहे, असे म्हटले.
दरम्यान, रमेश कुमार यांनी 2019 मध्ये म्हणजेच 2 वर्षांपूर्वी विधानसभा अध्यक्षपदी असतानाही वादग्रस्त विधान केलं होतं. माझे हाल बलात्कारी पीडित महिलेसारखे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. रेप एकदाच होतो, पण पुलीस आणि न्यायालयाकडून सातत्याने विचारणा होते. त्यामुळे, तोच बलात्कार कोर्टात 100 वेळा होतो, तशीच माझी अवस्था असल्याचं कुमार यांनी म्हटलं होतं.