बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:38 AM2023-08-04T07:38:28+5:302023-08-04T07:39:28+5:30
न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही.
भुवनेश्वर : विवाहित महिलेने कथित जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्याला विरोध केला नाही. तिला जखमा झाल्या नाहीत. एक विवाहित महिला असल्याने तिला लैंगिक संबंधांची चांगली माहिती होती. ती समोरील व्यक्तीला विरोध करू शकली असती. मात्र, तिने तसे केले नाही, असे म्हणत ओडिशा उच्च न्यायालयाने नुकतेच वहिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील आरोपीची निर्दोष सुटका केली.
न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही.
हे कृत्य संमतीशिवाय झाले असते, तर तिच्या शरीरावर काही जखमा झाल्या असत्या; कारण त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात महिलेकडून असा कोणताही विरोध झाला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पीडितेने या घटनेत फेरफार केला आणि तिच्यावर बलात्कार करत असल्याचे भासवले, असे कोर्टाने म्हटले.
नेमके काय घडले होते?
२०१४ मध्ये ती एका सांयकाळी जंगलातून घरी जात असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने म्हटले होते. तिच्या पतीने तिचा शोध सुरू केला असता ती त्याच्या लहान भावासोबत नको त्या स्थितीत आढळून आली. यावेळी पतीला पाहून महिलेने आरोपीला लाथ मारत घटनास्थळावरून पळ काढला.
महिलेने आक्षेप घेतला नाही -
- पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी जबाबदार ठरवले. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
- आरोपीने केलेल्या कथित लैंगिक संबंधांवर महिलेने आक्षेपही घेतला नाही किंवा विरोधही केला नाही, या वस्तुस्थितीमुळे न्यायालयाने आरोपीविरुद्धचा खटला अखेर रद्द केला.