आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:59 PM2020-06-27T23:59:07+5:302020-06-27T23:59:33+5:30
काँग्रेसचे नेते चिदंबरम यांचे ट्विट । ‘त्या’ घटनेचा घुसखोरीशी काय संबंध?
नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनने जर चीनचा पैसा परत केला, तर चिनी सैन्याचे अतिक्रमण हटणार आहे काय? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत आरोप केले होते.
चिदंबरम यांनी टष्ट्वीट केले आहे की, नड्डा हे अर्धसत्य बोलण्यात माहीर आहेत. माझे सहकारी रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी हे अर्धसत्य समोर आणले आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला १५ वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानाचा मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२० मधील चीनच्या घुसखोरीशी काय संबंध? असे समजा की, आरजीएफने २० लाख रुपये परत केले, तर पंतप्रधान मोदी देशाला असा विश्वास देतील का की, चीन आपले अतिक्रमण रिकामे आणि तेथील परिस्थिती पूर्ववत करील.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही म्हटले आहे की, चिनी घुसखोरीपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरूआहे. दिव्यांगांचे कल्याण आणि भारत-चीन संबंधावरील संशोधनासाठी ही रक्कम मिळाली होती, तसेच रिटर्न फाईल करताना याचा उल्लेख करण्यात आला होता.
वस्तुस्थिती काय आहे पाहा
चिदंबरम यांनी म्हटले आहे की, नड्डाजी वस्तुस्थिती काय आहे पाहा. अर्धसत्य सांगू नका. कृपया, चीनच्या घुसखोरीबाबत आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. नड्डा यांनी असा आरोप केला आहे की, २००५ मध्ये आरजीएफला चिनी दूतावासाकडून पैसे मिळाले होते.