लखनौ : गेल्या काही वर्षांपासून 'मंदिर वही बनाऐंगे' चा नारा प्रत्येक निवडणुकीमध्ये घुमत आहे. मंदिर बनणार की नाही हा भाग वेगळा. परंतू आज यात आणखी एका मंदिराची भर पडली आहे. आता राज्य एक असले तरीही पक्ष मात्र वेगळा आहे. तो म्हणजे भगवान कृष्णाचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्ष. या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज भगवान विष्णूचे मंदिर आणि नगर वसविण्याचे आश्वासन दिले आहे.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये 'मंदिर वही बनाऐंगे' चे नारे घुमू लागणार आहेत. यापुर्वीच अखिलेश यादव यांनी सत्तेत आल्यास राम, कृष्ण यांचे मुळ रुप असलेल्या भगवान विष्णूचे मंदिर बनविण्याचे आश्वासन देत भाजपवर कडी केली आहे.
भगवान विष्णू यांचे भव्य दिव्य असे कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोरवाट मंदिरासारखे बनविण्यात येणार आहे. तसेच इटावाच्या जवळ असलेल्या 2 हजार एकर जागेमध्ये शहरही वसविले जाईल. चंबळच्या क्षेत्रात बिहाडमध्ये मोठी जागा आहे. या जागेत विष्णुचे भव्य मंदिर बांधू, असे आश्वासन अखिलेश यांनी दिले आहे.
सपा सत्तेत आल्यास कंबोडियाला अभ्यासकांचे एक पथक पाठिवले जाईल. भाजप ही षड्यंत्र आखणाऱ्यांचा पक्ष आहे. जो प्रत्यक्षात काहीच करत नाही आणि जनतेला मूर्ख बनवतो, असा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
यापूर्वी बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात अंगकोरवाटच्या धर्तीवर भव्य असे विराट रामायण मंदिर बांधण्याची योजना जाहीर केली गेली होती. मात्र, याला कंबोडिया सरकारने विरोध केला होता.