नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.आ. जीवराज यांनी चिकमंगळुरूच्या कोप्पा येथील सभेत हे विधान केले. ते तेथील शृंगेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकात संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांनी संघाच्या विरोधातच लिखाण केले.त्यांनी तसे लिखाण केले नसते, तर कदाचित त्या आज जिवंत राहिल्या असत्या. त्यांनी ज्या प्रकारे संघ व भाजपाविरोधात लेखन केले, ते पूर्णपणे चुकीचे होते, असे सांगतानाच, गौरी लंकेश या मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारवही आ. जीवराज यांनी केली.ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्या यांचा सवालविरोधी पक्षांनी आ. जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जीवराज यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच ते सांगू इच्छित आहेत की काय, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वक्तव्याबद्दल आ. जीवराज यांच्या विरोधात शृंगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नंतरचा खुलासाविरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी, मी असे वक्तव्य केलेच नव्हते, प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असा खुलासा केला. सिद्धरामय्या सरकारने आधीच्या हत्यांचा नीट तपास करून आरोपींना तुरुंगात टाकले असते, तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, असे आपण म्हणालो, असा दावा त्यांनी केला. पण त्यांनी कानडीत केलेल्या भाषणाच्या चित्रफितीमधून त्यांनी गौरी यांच्या हत्येचे समर्थन केल्याचे स्पष्ट होते.कोण आहेत जीवराज : आ. जीवराज यांच्या विरोधात एका २३ वर्षीय महिलेच्या अपहरण व बलात्काराचा गुन्हा २0१३ साली दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी चिकमंगळुरूमध्ये गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केला होता. त्यानंतर जीवराज यांनी गोरक्षकांचे समर्थन केले होते.तपास दोन आठवड्यांत करागौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीने दोन आठवड्यांत पूर्ण करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण तो दोन आठवड्यांतपूर्ण न झाल्यास आम्ही तपास सीबीआयकडे सोपवू, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:58 AM