रतलाम : काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांना मोहम्मद अली जिनांबाबतचे वक्तव्यावरून टीका सहन करावी लागलेली असतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने नेहरुंवर टीका करताना देशाच्या फाळणीवर वक्तव्य केले आहे. यामुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत.
देशाच्या फाळणीला जबाबदार कोण, यावरून बरेच मतभेद आहेत. काहीजण फाळणीच्या बाजुने तर काहीजण फाळणीच्या विरोधात मते मांडत असतात. मात्र, बऱ्याचदा पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिनांबाबत विधाने केली जातात. यावेळी भाजपाचेरतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी नेहरुंवर टीका करताना जिनांना पंतप्रधान बनवायला हवे होते, असे वक्तव्य केले आहे.
भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जर नेहरुंनी हट्ट केला नसता तर आज देशाचे दोन तुकडे झाले नसते. मोहम्मद जिना एक वकील, एक विद्वान व्यक्ती होते. तेव्हा जर आमचा पंतप्रधान मोहम्मद अली जिनाच हवा, असा निर्णय घेतला गेला असता तर या देशाचे तुकडे झाले नसते, असे स्तुतीसुमनांचे वक्तव्य गुमानसिंह डामोर यांनी केले आहे.
गुमानसिंह डामोर हे मध्यप्रदेशमधील भाजपाचे आमदार आहेत. त्यांनी याआधीही जम्मू काश्मीरवरून पुलवामा हल्ल्यानंतर वक्तव्ये केली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जर शांतता हवी असेल तर अशांत जिल्ह्यांचे वेगळे राज्य बनविण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्या राज्यात केवळ चार जिल्हे अशांत आहेत. यामुळे या चार जिल्ह्यांना वेगळे करावे. जम्मू आणि लडाखचे क्षेत्र शांत आहे. वेगळे केल्यास तेथील अशांततेशी चार हात करता येतील, असे ते म्हणाले होते. यावरच ते थांबले नाहीत तर मध्य प्रदेशपासून छत्तीसगड वेगळे केल्याचे उदाहरणही त्यांनी तेव्हा दिले होते.