पंजाबमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींनी आता नवं वळण घेतलं आहे. या राजकीय लढाईत आता नेते एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करू लागले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका करताना पंजाबमध्ये बदलाच्या नावावर मान यांनी त्यांच्या पत्नीशिवाय काहीही बदललेलं नाही, अशी टीका केली होती. त्याला आता भगवंत मान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मान म्हणाले की, मी सिद्धू यांना आठवण करून देऊ इच्छितो की, सिद्धू त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीचे मुलगे आहेत. सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते.
आता या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत भगवंत मान यांना सल्ला दिला आहे. त्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री भगवंत मान साहेब, नवज्योत सिंग सिद्धधू यांनी तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर गांभीर्याने टिप्पणी केली होती, असं मला वाटत नाही. कारण आम्हाला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. मात्र तुमच्याकडे असलेली काही माहिती चुकीची आहे. नवज्योत सिंग सिद्धूंचे वडील भगवंत सिंग सिद्धू यांचं केवळ एकच लग्न झालं होतं.
सिद्धू यांच्यावर टीका करताना भगवंत मान म्हणाले होते की, नवज्योत सिंग सिद्धू हे आदर्शवादी राजकारणाचा दावा करतात. मात्र कट्टर विरोधक विक्रम मजिठिया यांची गळाभेट घेतल्यानंतर त्यांचा स्तर एवढा घसरला आहे की, पंजाबची जनता आश्चर्यचकीत झाली आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही नेते आपच्या आमदार जीवनज्योत कौर यांच्याकडून पराभूत झाले आहेत. त्यामुळे क्षीण झालेलं आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणं त्यांना भाग पडत आहे.