नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरुन एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींना शाहबानो आठवते, मग अखलाक, तबरेज अन्सारी, पेहलु खान आठवत नाही का? असा सवाल औवेसी यांनी केला असून नरसिम्हा राव यांच्या सरकारच्या काळात बाबरी मस्जिद पाडली गेली अशी टीका मोदींवर केली.
असदुद्दीन औवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपामधून किती मुस्लीम खासदार निवडून आले आहे? मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची भाषा करता मुस्लिमांना आरक्षण का देत नाही? जर मुस्लिम गटारात राहत असतील तर त्यांना गटारातून बाहेर काढा असं औवेसी मोदींना म्हणाले.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. या भाषणादरम्यान मोदींनी काँग्रेस सरकारच्या काळात एका मंत्र्याने केलेलं विधान सभागृहात सांगितले. जर मुस्लिमांना गटारात राहायचं तर राहू द्या असं विधान काँग्रेसच्या मंत्र्याने केलं होतं अशी आठवण मोदींनी सभागृहात करुन दिली. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, कोणाचे संख्याबळ किती आहे, हे महत्त्वाचे नसून, सर्वांनीच देशाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना, त्यातही विशेषत: काँग्रेस सदस्यांना उद्देशून केले होते. निवडणुकांतील विजय आणि पराभवाच्या पलीकडे आपण पाहायला हवे आणि देशातील १३0 कोटी जनतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक भारतीयाला घर आणि प्रत्येक घरात शौचालय या योजनेवर पंतप्रधानांनी भाषणात भर दिला. महिलांना अडचणीच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय आवश्यक आहे, असे सांगताना मोदी यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत डॉ. राम मनोहर लोहिया यांनी याचा उल्लेख केला होता आणि त्यांनी म्हटले होते, ते काम पूर्ण केले जाईल, असा दावा केला.
तसेच काँग्रेसचे लोकसभेतील नेते आधीर रंजन चौधरी यांनी तुम्ही ज्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चोर म्हणत होता, त्याचे काय झाले? आमचे हे दोघे नेते या सभागृहात आहेत, असा टोला पंतप्रधानांना लगावला होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी त्याचा आवश्य आनंद घ्यावा. उठसूट कोणालाही तुरुंगात टाकायला आम्ही देशात आणीबाणी लागू केलेली नाही. देशात स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून, १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, त्याचा या विधानाला संदर्भ होता. आणीबाणी हा देश व लोकशाहीवरील काळा डाग होता, अशी टीकाही त्यांनी केली होती.