Devendra Fadnavis: 'मुघल संग्रहालयाचे शिवाजी संग्रहालय करण्यात आले आहे. पण, उत्तर प्रदेश सरकारने याचा ताबा महाराष्ट्र सरकारला द्यावा. हे स्मारक झाल्यानंतर ताजमहालपेक्षा जास्त लोक स्मारक बघायला आले नाहीत, तर माझं नाव बदलून ठेवा', असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आग्रा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 'शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथील शिवाजी संग्रहालयाचा ताबा महाराष्ट्र सरकारकडे द्यावा आणि स्मारक उभारू, अशी प्रस्ताव वजा विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.
'माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही'
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "योगींनी मुघल संग्रहालयाला शिवाजी संग्रहालयात बदलले. तर मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की, इथे एक भव्य दिव्य स्मारक बनेल. पण, एक याचक म्हणून मी योगीजींना विनंती करतो की, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. महाराष्ट्राचे सरकार या संग्रहालयाचा ताबा घेईल."
"महाराष्ट्रातील सरकार इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारेल. आई शप्पथ सांगतो, एकदा हे स्मारक बनले, तर तुमच्या ताजमहालपेक्षा जास्त लोक हे स्मारक बघण्यासाठी नाही आले, तर माझं नाव बदला. मी माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
औरंगजेब आपला नायक नाहीये -देवेंद्र फडणवीस
"औरंगजेबाचे सैन्य वेतनासाठी लढत असे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढत असत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले आणि दख्खन विजयाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच खोदण्यात आली. त्या औरंगाबादचे आम्ही छत्रपती संभाजीनगर केले. कारण औरंगजेब आपला पूर्वज नाही, नायक नाही", असे देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात बोलताना म्हणाले.