कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून अलिकडच्या आपल्या सर्वच भाषणात त्यांनी मिशन २०२४ चा नारा दिल्याचे दिसून येते. येथील भाषणाताही त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. शुक्रवारी बीरभूम जिल्ह्यातील सिऊडी येथील सभेत पश्चिम बंगालमधील बॅनर्जी सरकारवर शहा यांनी प्रहार केला. तसेच, बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास येथील राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ला करायची हिंमत कोणी करणार नाही, असे म्हणत शहा यांनी एकप्रकारे बंगाली नागरिकांना हिंदूत्त्वाचा मुद्द्यावरुन एकत्र येण्याचं सूचवलं आहे.
अमित शहा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून त्यांनी ममता बॅनर्जी यांना हीटलर म्हणत राज्य सरकावर निशाणा साधला. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत सन २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी, भाजपला प. बंगालमधून लोकसभेच्या ३५ हून अधिक जागा जिंकून द्या, असे आवाहनही अमित शहांनी केलंय. तसेच, येथे भाजपा आल्यास राम नवमीच्या मिरवणुकांवर हल्ले होणार नाहीत. तर, २०२५ पर्यंत ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळणार, असं भाकीतही शहा यांनी केलं.
बंगालमधील दीदी-भतीजा यांची गुंडगिरी संपवायची आहे. ममता दीदींची हिटलरशाही भाजपा चालून देणार नाही. बंगालमध्ये घुसकोरांना रोखायचं असेल, दहशतवादापासून मुक्त व्हायचं असेल, तर येथे भाजप सरकारला बहुमत देण्याचं आवाहन अमित शहा यांनी केलंय. दरम्यान, अमित शहा हे रामनवमीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी बीरभूममध्ये भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी, आयोजित सभेत चौफेर फटकेबाजी करत ममता बॅनर्जींना लक्ष्य केलं.