नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; वडेट्टीवारांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 05:55 AM2023-05-26T05:55:22+5:302023-05-26T05:55:55+5:30
राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे.
- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले असून, या नेत्यांनी एकानंतर एक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवावे, अशी विनंती केली आहे. राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे.
यातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे की, पटोले यांचा राज्यातील कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणालाच बरोबर घेत नाहीत. अलीकडेच प्रदेश काँग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. नाना पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस कार्यकारिणीचे गठण झाल्यानंतर लगेच महाराष्ट्राबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी या नेत्यांना आश्वासन दिले आहे; परंतु ‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मागील अनेक महिन्यांपासून कर्नाटक निवडणुकीत व्यग्र होते व त्यांचे जाणेही निश्चित आहे. महाराष्ट्र काँग्रेसला आधी नवीन सरचिटणीस प्रभारी मिळतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत निर्णय घेण्यात येईल.