नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात सत्ताधारी एनडीए आघाडी भाजपाच्या नेतृत्वात अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्याची तयारीत आहे. तर विरोधी इंडिया आघाडीत अद्याप जागावाटपावरून तिढा सुटलेला नाही. इंडिया आघाडीत राज्यांपासून दिल्लीपर्यंत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दररोज बैठका घेतल्या जात आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. परंतु यूपी आणि बिहारपासून पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही.
विविध राज्यात वेगवेगळ्या पक्षांचा आपापला फॉर्म्युला आहे. प्रत्येकाच्या मागण्या आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडी असेल अथवा नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष, दोघेही जागावाटपात तडजोड करायला तयार नाहीत. यूपीत समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनीही जागांची संख्या ठाम सांगितली आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटही २३ जागांसाठी आग्रही आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या आप पक्षाने गोवा, गुजरात आणि हरियाणात काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केलीत.
इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे. यूपीत इंडिया आघाडीचे नेतृत्व समाजवादी पार्टी करेल असं अखिलेश यादवनं स्पष्ट केलंय. एकीकडे सपाने काँग्रेससोबत बोलणी सुरू केलीत तर दुसरीकडे ६५ जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेस आणि सपा यांच्यात आघाडी झाली तर १५ लोकसभा जागांसाठी जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक दललाही सोबत घ्यावे लागेल. जयंत चौधरी ६ जागांची मागणी करत आहेत. अशावेळी काँग्रेसला यूपीच्या ८० जागांपैकी केवळ ९ जागा शिल्लक राहतात.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट २३ जागांची मागणी करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपासोबत मैदानात उतरून शिवसेनेने २३ उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जागांवर विजय मिळाला. परंतु तेव्हा पक्ष मजबूत होता. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागांवर विजय मिळाला होता. २०१९ मध्ये ज्या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार उभे केले होते त्या जागा पुन्हा लढवण्यासाठी ते आग्रही आहेत. राष्ट्रवादीनेही १२ जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ४ जागांची मागणी केली आहे. राज्यात एकूण ४८ जागा असून काँग्रेसला सोडलं तर जवळपास ४० जागा घटक पक्ष मागत आहेत.