देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत आली आहे. केवळ अखेरचा टप्पातील मतदान आता शिल्लक आहे. यातच भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. हे दोघेही सरकार स्थापनेचा दावा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, राजनैतिक पातळीवर नव्या सरकारची तयारीही सुरू झाली आहे. नवे सरकार स्थापन होताच नवे पंतप्रधान विविध देशांना भेट देणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जे कुणी देशाचे पंतप्रधान होईल, त्यांचा पहिला दौरा इटलीला होऊ शकतो. कारण तेथे 13 ते 15 जून दरम्यान G-7 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय G-7 शिखर परिषदेची तयारी करत आहे. या परिषदेत जगातील सर्वात प्रगत देश जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धांचे परिणाम या विषयांवर चर्चा करणार आहेत.
G-7 बैठकीपूर्वी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री 11 जून रोजी रशियात होणाऱ्या BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रशिया ऑक्टोबरमध्ये ब्रिक्स परिषदेचे आयोजन करणार आहे. भारताचे पंतप्रधान जुलैमध्ये कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या SCO शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येऊ शकतात. भारताचे पंतप्रधान कझाकिस्तानमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
जी-7 देशांच्या बैठकीनंतर स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता शिखर परिषद होणार आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्री या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. या शिखर परिषदेसंदर्भात रशियाने आक्षेप व्यक्त केला आहे. सचिव स्तरावरील अधिकारी भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन या परिषदेत सहभागी होणार की नाही? या संदर्भात अद्याप कसलीही पुष्टी झालेली नाही.