ग्वाल्हेर - एखाद्या गुन्ह्यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यास त्यास पत्नीप्रति क्राैर्य मानले जाऊन पत्नीला घटस्फाेट दिला जाऊ शकताे, असे ग्वाल्हेर खंडपीठाने म्हटले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने घटस्फाेटाची पत्नीची याचिका मंजूर केली.
न्यायालयाने म्हटले की, पती किंवा पत्नीला गुन्ह्यात दाेषी ठरविल्यास घटस्फाेट देण्याची तरतूद नाही. मात्र, मानसिक क्राैर्याच्या आधारे दिलासा दिला जाऊ शकताे. कोर्टाने काैटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविराेधात पत्नीने केलेली याचिका मान्य केली. हत्येच्या प्रकरणात तिच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावण्यात आली हाेती. पत्नीचा हा मानसिक छळ असून, ती घटस्फाेट घेऊ शकते, असे न्या. विवेक रुसिया आणि न्या. राजेंद्रकुमार वाणी यांच्या खंडपीठाने म्हटले.
कोर्टाने काय म्हटले?या दाम्पत्याला सहा वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नी गेल्या सहा वर्षांपासून एकत्र नाहीत. अतिशय रागीट आणि आक्रमक स्वभावाच्या व्यक्तीसाेबत वैवाहिक संबंध ठेवणे काेणत्याही पत्नीला शक्य नाही. हे प्रकरण केवळ एक दाेषी पतीसाेबत राहण्याचे नाही, तर त्यांना एक मुलगी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पित्यासाेबत राहणे हे तिच्यासाठी याेग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले.