सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिथे सत्ताधारी भाजपाची सत्ता धोक्यात असल्याचे संकेत विविध सर्व्हेंमधून मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारही विरोधकांकडून एकापाठोपाठ एक करण्यात येत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले आहे. अदानी प्रकरणावरून विरोधाकांची एकजूट होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज निवडणूक झाल्यास त्यात कोण बाजी मारेल, कुणाचं पारडं जड ठरेल, याबाबतचा अंदाज राजकीय वर्तुळात घेतला जात आहे. या प्रश्नांचं उत्तर जाणून घेणारा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून आज लोकसभेची निवडणूक झाल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा पुन्हा एकदा बादी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्च यांनी हा सर्वे केला आहे. या सर्व्हेमधून विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व्हेत वर्तवलेल्या अंदाजानुसार आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपा आणि मित्र पक्षांना २९२ ते ३३८ जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना १०६ ते १४४ जागा मिळतील. तृणमूल काँग्रेसला २० ते २२ जागा मिळतील. तर इतर पक्षांच्या खात्यात ६६ ते ९६ जागा जातील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही भाजपा आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. भाजपा आणि मित्र पक्षांना ३८.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना २८.७ टक्के मते मिळतील. इतर पक्षांच्या खात्यामध्ये ३३.१ टक्के मते जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानपदासाठी सर्वात प्रबळ चेहऱ्याबाबत या सर्व्हेमधून विचारणा केली असता त्यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वरचढ असल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने ६४ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये आपला कल नोंदवला. तर १३ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली. नितीश कुमार यांना ६, केसीआर यांना ५, तर अरविंद केजरीवाल यांना १२ टक्के लोकांनी पसंती दिली.
तर २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल याबाबत विचारणा केली असता २९ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली. तर १३ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी, १९ टक्के लोकांनी केजरीवाल तर ७ टक्के लोकांनी केसीआर आणि ८ टक्के लोकांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे.
२०२४ मध्ये भाजपा पुन्हा एकदा ३०० जागा जिंकणार का, असा प्रश्न विचारला असता ४२ टक्के लोकांनी भाजपा ३०० हून अधिक जागा जिंकेल, यात कुठलीही शंका नसल्याचे सांगितले. तर २६ टक्के लोकांनी भाजपाला ३०० जागा जिंकणे कठीण जाईल, असे सांगितले. तर १९ टक्के लोकांनी याबाबत निवडणुकीच्या वेळीच कळेल, असे सांगितले.