अनुभा जैन
लोकमत न्यूज नेटवर्क, बंगळुरू : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३चे लँडिंग सुरळीतपणे पार पाडणे हे मोठे आव्हान होते. या प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीवर इस्रोने मात केली ही मोठी कामगिरी आहे. ही गणिते चुकल्यास मोहीम अयशस्वी ठरली असती, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चंद्रयान-३ची कामगिरी जशी फत्ते केली तशी येत्या काही वर्षांत मंगळावर यान उतरविण्याचे लक्ष्यही भारत नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एस. सोमनाथ म्हणाले, चंद्रयान-३च्या विक्रम रोव्हरचे बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग झाले. त्यात चंद्रयान-३ लाँच करण्याचा पहिला टप्पा आम्हा सर्वांसाठी खूपच कठीण होता. त्यानंतर तिथे लँडिंग हा दुसरा टप्पा व चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग सुरू करणे हा तिसरा टप्पा होता. या तीन टप्प्यांमध्ये खूप तांत्रिक गोष्टी जोडल्या गेलेल्या होत्या. त्यांचे गणित बिघडले असते तर चंद्रयान-३ ही मोहीम अयशस्वी झाली असती. पण, सुदैवाने इस्रोने या मोहिमेत सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले. चंद्रयान-३ मधील विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर या गोष्टी स्वदेशी बनावटीच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
‘ती सारी उणीव चंद्रयान-३ मोहिमेत भरून काढली’
- इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, चंद्रयान-३ मोहिमेची सर्व उद्दिष्टे इस्रो पूर्ण करणार आहे. आपल्या हाती प्रगत तंत्रज्ञान नसताना चंद्रावर यान पाठवून ते तिथे उतरविणे ही सोपी कामगिरी नव्हती.
- मात्र, चंद्रयान-१ व चंद्रयान-२ या मोहिमांच्या अनुभवांतून आम्ही ते प्रगत तंत्रज्ञान विकसित केले व चंद्रयान-३चे यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केले.
- इस्रोला चंद्रयान-२मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात अपयश आले होते. पण, ती सारी उणीव चंद्रयान-३ मोहिमेत भरून काढली आहे.