एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पोहोचल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे ज्या राष्ट्रीय शक्तीचा उल्लेख करत होते, ती भाजपाच तर आहे, दुसरी कोणती शक्ती आहे? असा सवाल करत त्यांना सत्ता परिवर्तन करायचे आहे, यामुळे ते हे प्रकार करत असल्याची टीका पवारांनी केली आहे.
याचबरोबर मी राज्यातील चर्चेसाठी दिल्लीत आलेलो नाही, तर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी अर्जासाठी आलो आहे, असे पवार म्हणाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. परंतू आम्हाला शिवसेनेने भेटून सरकारला पाठबळ असल्याचे सांगितलेय, यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे. तोच कायम ठेवायचा आहे, असेही पवार म्हणाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत कोण बोलले माहिती नाही, परंतू राष्ट्रपती राजवट लागली तर शिंदेंच्याच प्रयत्नांवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. आता त्याना भाजपाने काय आश्वासन दिलेय आम्हाला माहिती नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे. गेल्या अडीज वर्षांत त्यांना त्रास झाला नाही, राष्ट्रवादीने त्रास दिल्याचे आताच कसे बाहेर आले, असा सवालही पवार यांनी केला.
आमच्या आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे काही मागण्या केल्या जातील. त्यात कठोर कारवाई करण्याबाबत पाऊले उचलली जातील, असेही पवार म्हणाले. निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवतो. मात्र जेव्हा दोन उमेदवार असतात, तेव्हा दोन्हीही जिंकतील असे होत नाही. प्रत्येक उमेदवाराची परिस्थिती वेगळी असू शकते. मात्र, ही तत्वांची लढाई आहे. विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्यांना जिंकून आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत, असेही पवार म्हणाले.