Ram Gopal Yadav on Anuj Chaudhary: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आखिलेश यादव यांचे काका राम गोपाल यादव यांनी आज (7 मार्च) फिरोजाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राम गोपाल यादव यांनी 130 बोटी चालवणाऱ्या महाकुंभातील त्या खलाशावर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय, त्यांनी पोलिस अधिकारी अनुज चौधरी यांच्यावरही निशाणा साधला.
रामगोपाल यादव म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो दावा केला, तो पूर्णपणे चुकीचा आहे. बोट चालवून 45 दिवसात 30 कोटी रुपये कमावू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. या सरकारला नावं बदलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम येत नाही.
सीओ अनुज चौधरी तुरुंगात जातील....यावेळी त्यांनी सीओ अनुज चौधरी यांनी दंगल घडवून आणल्याचा आरोप केला. अनुज चौधरी म्हणत होते शूट, शूट, शूट...त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? राज्यात सत्तांतर होईल, तेव्हा असे लोक नक्की तुरुंगात जातील.
अबू आझमीचे समर्थनअबू आझमी जे बोलले ते योग्य नव्हते, पण मीडियाने जे दाखवले तेही योग्य नव्हते. औरंगजेबाबद्दल म्हणाले की, त्याने मंदिरे उध्वस्त केली नाहीत. औरंगजेबाने बहुतांश मंदिरे नष्ट केली आणि काही मंदिरांना पैसेही दिले. सध्यच्या काळात अशी विधाने करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
अनुज चौधरी चर्चेत
आठवड्याभरावर होळीचा सण आल्याने सर्वत्र जोरदार तयारी सुरु झालीय. देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा होतो. मात्र उत्तर प्रदेशात होळीच्या सणावरुन अनुज चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम समाजाला उद्देशून होळी सणाबाबत केलेल्या विधानाने वातावरण तापले असून देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. होळीचा सण आवडत नसेल तर घरात बसा असा सल्ला उत्तर प्रदेशातील अनुज चौधरी यांनी दिला आहे.
जे शांतता समितीच्या बैठकीसाठी आले नाहीत त्यांना मी सांगतोय की शुक्रवारची नमाज वर्षातून 52 वेळा येते, पण होळी फक्त एक दिवस आहे. ज्याला होळी खेळायची आहे आणि ज्याच्यामध्ये होळी खेळण्याची क्षमता आहे, त्यानेच घरातून बाहेर पडावे. अन्यथा घरातच राहून नमाज अदा करावी. कारण, पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचा उपद्रव सहन करण्याच्या मनस्थितीत नाही. ज्या व्यक्तीला रंग आवडत नाही त्यांनी घराबाहेर पडू नये. ज्यांची रंग सहन करण्याची क्षमता आहे त्यांनीच घरातून बाहेर पडावं, असेही अनुज चौधरी म्हणाले.