ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) 1 एप्रिलपासून एटीएमसहीत अन्य सेवांच्या मोबदल्यात अधिक सेवाकर आकारणार आहे. बचत खात्यात किमान शिल्लक ठेवले नाही तर SBI खातेदारांकडून दंड आकारणार आहे. SBI व्यतिरिक्त अन्य ATM मधून महिन्यातून तीनपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारास 20 रुपये व बँकेच्याच ATM मधून पाचपेक्षा अधिक वेळा व्यवहार केल्यास 10 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, ग्राहकाच्या खात्यात 25,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास एटीएमच्या व्यवहारात कोणताही सेवाकर लागू होणार नाही, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे. सोबत, ग्राहकाच्या खात्यात 1 लाख रुपयांहून अधिक ठेवी शिल्लक असल्यास अन्य बँकेच्या एटीएममधून केलेल्या व्यवहारावरही कोणतेही शुल्क लावले जाणार नाही.
याव्यतिरिक्त, तीन महिन्यात सरासरी 25,000 रुपये शिल्लक ठेवणा-या डेबिट कार्डधारकांना SBIकडून एसएमएस अॅलर्टचे 15 रुपये शुल्क सेवा आकारण्यात येणार आहे. दरम्यान, 1000 रुपयांपर्यतच्या UPI/USSD व्यवहारावर कोणताही चार्ज लावला जाणार नाही.
मोठ्या शहरांमध्ये 5 हजार, छोट्या शहरांमध्ये 3 हजार, निमशहरी भागांत 2 हजार आणि ग्रामीण क्षेत्रांत 1 हजार इतकी किमान रक्कम एसबीआय खात्यांमध्ये राखणं अनिवार्य असणार आहे. एसबीआयने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, अशा प्रकारे खात्यांमधल्या किमान रकमेच्या 75 आणि त्यापेक्षा कमी टक्क्यांहून कमी रक्कम ठेवल्यास 50 ते 100 रुपये दंड आणि सेवाकरही दंड म्हणून लागू होणार आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंमबरम यांनी बँक व्यवहारातील नवीन नियमांवर टीका केली आबे. काही सरकारी आणि खासगी बँकातील व्यवहारांवर वाढवण्यात आलेली शुल्क सेवा हे चुकीचे धोरण असल्याचे मत चिदंमबरम यांनी मांडले आहे.
बँक खात्यातील किमान रक्कम ठेवणे आणि अन्य व्यवहारावरील वाढण्यात आलेले सेवा शुल्क एक प्रतिगामी पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवर दिली आहे.