ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. 20 - शिक्षण पद्दतीत भगवाकरण करणं जर देशाच्या हिताचं असेल तर करण्यात येईल असं वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कठेरिया यांनी केलं आहे. राम शंकर कठेरिया स्मृती इराणींच्या शिक्षण मंत्रालयातील मंत्री आहेत. राम शंकर कठेरिया यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लखनऊ विद्यापीठातील हिंदवी स्वराज्य दिवस कार्यक्रमात बोलताना राम शंकर कठेरिया यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'काही पत्रकारांनी आम्हाला काही लोक सरकार शिक्षण क्षेत्रात भगवेकरण करत असल्याचं बोलत असल्याचं सांगितलं. त्यांना सांगू इच्छितो भगवेकरण देशात आणि शिक्षणात दोन्हीकडे होणार आहे. जे काही देशाच्या हिताचं असेल ते होईल. मग ते भगवेकरण असो अथवा संघवाद' असं राम शंकर कठेरिया बोलले आहेत.
जे काही देशाच्या हिताचं असेल, ज्याच्या आधारावर जगात आपण सन्मानाने उभे राहू त्याला शिक्षणाचा आणि अभ्यासक्रमाचा भाग बनवलं पाहिजे. ते आपल्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. आपली मुलं जर महाराणा प्रताप किंवा शिवाजी महाराजांबद्दल वाचणार नाहीत तर मग चंगेज खानबद्दल वाचायचं का ? असा सवाही राम शंकर कठेरिया यांनी यावेळी विचारला.