जम्मू : आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा कोणीही असूद्या, भारत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी येथे म्हणाले. जर एखादे युद्ध झाले तर भारत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जर एखाद्या विदेशी शक्तीने आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले आणि युद्ध झाले तर आम्ही विजयी होऊ. भारताने १९४७ नंतरच्या सर्व युद्धांत पाकिस्तानला हरविले. दोन दशकांहून अधिक काळापासून हजारो आघातांनी भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न त्याने केला. दरवेळी आमच्या शूर सैनिकांनी भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही, हे दाखवून दिले.
तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड लष्करी दलांतील समन्वय वाढविण्यासाठी तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी येथे केली. लष्करी उपकरणांचा जगातील सर्वांत मोठा आयातदार असलेला भारत आता वेगाने त्याचा निर्यातदार बनतोय, असेही ते म्हणाले.