विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:43 AM2023-11-17T08:43:01+5:302023-11-17T08:43:31+5:30
त्रिकाेणी लढतीकडे राज्याचे लक्ष
हैदराबाद : तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला नाही तर तो प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल, असे गोशामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकांतही ते गोशामहल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. टी. राजा सिंह यांनी सांगितले की, भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षातील नेत्यांशी हातमिळवणी केली आहे.
गोशामहल मतदारसंघात १७ हजार बोगस मतदारांची नावे नोंदविण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. टी. राजा सिंह यांची लढत बीआरएसचे नंदकिशोर व्यास व काँग्रेसच्या मोगिली सुनीता या उमेदवारांशी होणार आहे. राजा सिंह यांच्यावरील कारवाई पक्षाने मागे घेतली. त्यामुळे येथे रंगत निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)
‘तिसऱ्यांदाही मीच निवडून येणार’
भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी सांगितले की, मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहे. गोशामहल मतदारसंघात मी गेल्या नऊ वर्षांत ५०० कोटी रुपयांची विकासकामे करून घेतली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मोगिली सुनीता म्हणाल्या की, गोशामहल मतदारसंघात टी. राजा सिंह हे एकेकाळी अतिशय प्रबळ उमेदवार होते. पण आता तसे नाही. सिंह हे मतदारसंघात क्वचितच दिसतात.
विशिष्ट धर्माबद्दल अतिशय अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार टी. राजा सिंह यांना भाजपने निलंबित केले होते. ही कारवाई गेल्या महिन्यात मागे घेण्यात आली. पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर या घडामोडी घडल्या होत्या.
अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर २०२२मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला.