ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - खातेधारकांना आपल्या खात्यात किमान शिल्लक कायम ठेवणे अनिवार्य करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मर्यादेपेक्षा कमी रक्कम खात्यात ठेवणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची योजना आखली आहे. एक एप्रिलपासून खात्यात कमी रक्कम असणाऱ्यांकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात येईल, असे एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसबीआयने महानगरातील बँक खात्यांमध्ये किमान रकमेची मर्याद पाच हजार इतकी निश्चित केली आहे. तर अर्धशहरी भागांसाठी दोन हजार रुपये आणि ग्रामीण भागांसाठी एक हजार रुपये एवढी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या रकमेपेक्षा कमी रक्कम खात्यात जमा असेल. तर 1 एप्रिलपासून दंड आकारण्यात येईल. हा दंड खात्यातील शिल्लक रक्कम आणि किमान रक्कम यांच्यातील फरकावर आधारित असेल.
महानगरांमध्ये खात्यात किमान रकमेपेक्षा 75 टक्के पेक्षा कमी रक्कम असेल सेवा करासोबत 100 रुपये दंड आकारला जाईल. तर 50 ते 75 टक्के रक्कम कमी असल्यास सेवाकरासोबत 75 रुपयांचा दंड द्यावा लागेल. तर 50 टक्के पेक्षा कमी रक्कम असेल, तर सेवा कर आणि 50 रुपये दंड द्यावा लागेल. तर ग्रामीण भागात किमान शिल्लक रक्कम नसल्यास सेवा करासोबत 20 रुपयांपासून 50 रुपये दंड आकारला जाईल.