नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात इंग्रजांना आव्हान देण्याचे धाडस होते. स्वातंत्र्यावेळी ते असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे असोचेमद्वारे आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
डोवाल म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बोस निर्धाराने लढले. त्यांनी कधीही स्वातंत्र्याची भीक मागितली नाही. केवळ राजकीयदृष्ट्या न लढणाऱ्या लोकांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बोस हे धाडसी प्रवृत्तीचे नेते होते. त्यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याचेही धाडस होते. परंतु गांधीजींबाबत त्यांना प्रचंड आदर होता.
ते असते तर प्रसंगी देशाची फाळणीही झाली नसती. मोहम्मद अली जिना एकदा असेही म्हटले होते, की केवळ एकाच नेत्याचे ऐकले असते, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. देशासाठी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले योगदान हे अनुकरणीय असल्याचेही डोवाल यांनी नमूद केले.