अल्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे घोषित केले होते. ते आश्वासन त्यांनी अजिबात पूर्ण केले नाही आणि तरुणांची फसवणूक केली, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. मोदी यांनी आश्वासनानुसार नोकºया दिल्या असत्या, तर अल्वरमधील तिघा तरुणांना आत्महत्या करावीच लागली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.राजस्थान व तेलंगणात ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा उद्या, बुधवारी थंडावतील. अल्वरमध्ये काही दिवसांपूर्वी तीन तरुणांनी रेल्वेखाली जीव दिला होता. नोकरी मिळत नसल्याने ते व त्यांचे काही मित्र आत्महत्या करणार होते. त्यातील दोघांनी आयत्या वेळी माघार घेतली तर एक जण बचावला. त्याचा उल्लेख राहुल यांनी या सभेत केला.पंतप्रधान मोदी प्रत्येक सभेत भारत माती की जय अशी घोषणा देतात. प्रत्यक्षात मात्र ते आपल्या ठराविक उद्योगपती मित्रांनाच मदत करीत करतात. त्यामुळे त्यांनी अनिल अंबानी की जय, मेहुल चोक्सी की जय, नीरव मोदी की जय, ललित मोदी की जय अशा घोषणा द्यायला हव्यात, असा टोलाही गांधी यांनी लगावला. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना बँका व एटीएमसमोर आपल्याच पैशासाठी रांगा लावाव्या लागल्या. पण मोदी यांच्या मित्रांनी मात्र आपला काळा पैसा पांढरा करून घेतला. किंबहुना त्यासाठीच नोटाबंदी होती, असा आरोप त्यांनी केला.याच अल्वरमध्ये पेहलू खान नावाच्या मुस्लीम व्यक्तीची गोरक्षकांनी हत्या केली. त्याचा दुधाचा व्यवसाय असल्याने त्याच्याकडे गायीही होत्या. आणखी काही गायी खरेदी करून तो आपल्या गावी परतत असताना तथाकथित गोरक्षकांनी त्याची ठेचून हत्या केली होती. तो गोतस्कर आहे, असे त्यांनी परस्पर ठरवून टाकले होते. अल्वरमध्ये त्यामुळे पेहलू खानचा विषय आजही धगधगत आहे. पेहलू खान हत्याप्रकरणातील प्रमुख साक्षीदारांवर ते न्यायालयात साक्ष देण्यास जात असताना गोळीबार करण्यात आला. ते बोलेरो वाहनातून जात असताना, स्कोर्पिओमधून आलेल्या लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र ते बचावले होते. सध्या अल्वरमध्ये तरुणांची आत्महत्या व पेहलू खान हत्या हे दोन विषय खूप गाजत आहेत.
"नोकऱ्या दिल्या असत्या तर तरुणांना आत्महत्या करावी लागली नसती"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:40 AM