यदु जोशी -मोगा (पंजाब) : कोरोनाच्या पहिल्या भीषण टप्प्यात मुंबईतील हजारो उत्तर प्रदेश, बिहारसह परप्रांतीय मजुरांना वेळीच त्यांच्या राज्यांमध्ये पाठविले नसते तर शेकडो जणांचा भुकेने मृत्यू झाला असता, असे रोखठोक मत अभिनेते सोनू सोदू यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता असा सवालही सोनू सूद यांनी केला.
सोनू यांच्या भगिनी मालविका सूद काँग्रेसतर्फे लढताहेत. मालविका यांना ‘मोगाच्या सोनू सूद’ म्हटले जाते. इथे त्यांचे अतिशय मोठे सामाजिक कार्य आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत सोनू सूद म्हणाले की, मला कुणाच्या विधानावर टीका करायची नाही. मजूर तेव्हा असहाय होते. रात्रीबेरात्री मला फोन करायचे. रडायचे. त्यांचा आक्रोश बघवत नव्हता. चारपाच महिन्याची बाळे घेऊन महिला यायच्या, आम्हाला गावी जाऊ द्या अशी विनवणी करायच्या. भयंकर स्थिती होती. तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्याची परवानगी मिळाली तर सहा-सहा हजार लोक येऊन उभे राहायचे. त्यांना तेव्हा पाठविले नसते तर ते अन् त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती.
मजुरांच्या वेदना सांगताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते, घरभाड्यासाठी पैसे नव्हते. मग प्रवासासाठी कुठून पैसे येतील? त्यांना त्यांच्या माणसांजवळ परत पाठविणे हे भावनिकदृष्ट्याही त्यांना मोठा धीर देणारे ठरले. कोरोना पसरवायला ते गेले असे नाही म्हणता येणार. ते संकट इतके भीषण होते की त्या धक्क्यातून लोक आजही सावरलेले नाहीत.
मंत्रिपदाच्या ऑफर नाकारल्या -राजकारणात जाणारच नाही असे अजिबात नाही पण ती वेळ अजून आलेली नाही. अजून काही वर्षे मी सामाजिक कार्यच करणार. मुंबईनजीक हॉस्पिटल उभारतो आहे. आणखी बरेच काही करायचे आहे. यावेळी अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा कॅबिनेट मंत्रिपदाच्या ऑफर वेगवेगळ्या पक्षांकडून आल्या पण मी त्या नम्रपणे नाकारल्या.