महिला आरक्षण विधेयक अर्थात नारीशक्ती वंदन विधेयकाला बुधवारी लोकसभेने मंजूरी दिली. लोकसभेत सुमारे आठ तासांच्या चर्चेनंतर मतदान झाले आणि हे विधेयक दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली.
या विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, या विधेयकाची तत्काळ अंमलबजावणी केली जाऊ शकते. यासाठी नवीन जनगणना आणि परिसीमनाची आवश्यकता नाही. तसेच यात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणीही राहुल गांधींनी केली. राहुल गांधी यांच्या तत्काळ अंमलबजावणीच्या मागणीला अमित शाह यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, जर रिझर्व्हेशनमध्ये वायनाड रिझर्व्ह झाले तर...
लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, एक तृतियांश जागांचे रिझर्व्हेशन करायचे आहे. त्या जागा कोण निश्चित करणार? जे म्हणत आहेत, का करत नाही? कोण करेल? आम्ही करावे? आणि मग वायनाड रिझर्व्ह झाले तर, म्हणाल राजकारण केले. ओवेसी साहेबांचे हैदराबाद रिझर्व्ह झाले, तर म्हणाल, पॉलिटिकल रिझर्व्हेशन केले. परिसीमन आयोग प्रत्येक राज्यात जाऊन पारदर्शकपद्धतीने हे ठरवेल.
अमित शाह म्हणाले, काही पक्षांसाठी महिला सशक्तिकरण हा एक राजकिय अजेंडा असू शकतो, काही पक्षांसाठी महिला सशक्तिकरणाची घोषणा, निवडणूक जिंकण्याचे शस्त्र असू शसकते, पण भाजपसाठी महिला सशक्तिकरण हा राजकीय मुद्दा नसून मान्यतेचा मुद्दा आहे.