नवी दिल्ली: ईशान्य भारतात बांगलादेशमधून पद्धतशीरपणे लोकांचे लोंढे घुसवले जात आहेत. त्यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलत असून हा पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाचा भाग आहे असे सांगत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) या संघटनेचे उदाहरण दिले. दरम्यान, याप्रकरणी एआययूडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे वक्तव्य म्हणजे पूर्णपणे राजकीय असल्याचे म्हटले आहे.
बद्रुद्दीन अजमल म्हणाले की, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते वक्तव्ये करतात. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून करण्यात आले आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. केंद्र सरकारने येथे येणा-या प्रत्येक लोकांची चौकशी करावी आणि 1971 (बांग्लादेश फाळणी) नंतर आलेल्या लोकांना बांगलादेशात परत पाठवावे, अशी मागणी बद्रुद्दीन अजमल यांनी यावेळी केली आहे.
लष्करप्रमुखांनी राजकीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये- ओवेसीलष्करप्रमुखांनी देशातील राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, असे सांगत एमआयएमचे खासदार असुदद्दीन ओवेसी यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या विधानाविषयी नापसंती दर्शविली आहे. दिल्लीत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात बिपीन रावत यांनी आसाममधील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी रावत यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला.