कोलकाता - पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावले आहे. जर राज्यात भाजपाचे सरकार आले, तर तुमच्या सगळ्यांची वर्दी उतरवू, अशी धमकीच घोष यांनी पोलिसांना दिली. कोलकाता पोलीस आता या वर्दीच्या लायकीचे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. कोलकातापासून 180 किमी दूर असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना घोष यांनी पोलिसांना जाहीरपणे धमकीवजा इशारा दिला.
आम्ही सर्वच बाबीचे रेकॉर्ड ठेवत आहोत, त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांना बघून घेऊ, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या सर्वांना भरपाई करावीच लागेल, असेही घोष यांनी म्हटले. तसेच तृणमूल काँग्रेसचे कार्यालय म्हणजे बॉम्ब बनविण्याचे ठिकाण आहे. मात्र, पोलीस राज्यातील गुन्हे लपविण्याचे काम करत असल्याचेही घोष यांनी म्हटले.
दरम्यान, घोष यांच्या गाडीवर महिन्याच्या सुरुवातीलाच हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर, देशात केवळ प.बंगाल हे एकमेव राज्य आहे, जेथे लोकशाहीला अजिबात स्थान नाही, असेही सिंह यांनी म्हटले होते.