भागलपूर : मी पुन्हा सत्तेत आल्यास आपली भ्रष्टाचाराची दुकाने आणि घराणेशाहीचे राजकारण, संरक्षण व्यवहारांतील भ्रष्टाचार हे सारे कायमचे बंद पडेल, अशी भीती काँग्रेस प्रणीत विरोधकांच्या महाभेसळ आघाडीला वाटत आहे. त्यामुळेच ते भाजप व माझ्याविषयी देशात भीती पसरवत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
बिहारमधील भागलपूरच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, सैन्यदलांना असलेले विशेष अधिकार काढून घ्यावेत असे विरोधकांना वाटते. याउलट दहशतवादी व नक्षलवाद्यांचा मुकाबल्यासाठी सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, असे एनडीए सरकारचे मत आहे. जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर शेवटचीच निवडणूक ठरेल. सर्व घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल तसेच सध्याचे आरक्षण बंद होईल, अशी भीती विरोधक जनतेला दाखवित आहेत. मात्र तसे काहीही होणार नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेली आरक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत व्हावी यासाठीच या चौकीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)प्रश्न चिघळवत ठेवले : आसाममधील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, पाकवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागून काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशीच तडजोड केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष देशात घोटाळे करीत आला आहे.त्या पक्षातील एक परिवार भ्रष्टाचारात आकंठ बुडाला असून त्यातील सदस्य जामिनावर आहेत. तरीही तेच माझ्यावर चौकीदार चोर असल्याचा आरोप करीत आहेत.काँग्रेसचा आक्षेपआसाममध्ये मतदान असताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यात प्रचाराला येणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी घेतला आहे. मोदी हे उद्याही प्रचार करू शकत होते, असेही गोगोई म्हणाले.