कर्नाटक - Ananth Kumar Hegde's remarks on the Constitution ( Marathi News ) अबकी बार ४०० पार...बहुमत आल्यास संविधानात बदल करू. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजपा यात दुरुस्ती करेल. त्यासाठी लोकसभेत भाजपा दोन तृतीयांश बहुमत द्या. जेणेकरून देशातील संविधानात बदल करता येऊ शकतो असं वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. सहा वर्षापूर्वीही अशाचप्रकारे ते बोलले होते.
हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत. हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले.
तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं.
राहुल गांधींचा निशाणा
भाजपाला ४०० जागा संविधान बदल करण्यासाठी हव्यात. नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा छुपा अजेंडा आता सार्वजनिक झालाय. मोदी आणि भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवायचे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि स्वातंत्र्य यांच्याशी द्वेष आहे. समाजाचं विभाजन करणे, मीडियाला गुलाम बनवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणणं, यातून भारताच्या लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्याचं त्यांचं धोरण आहे अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाचं स्पष्टीकरण
विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक भाजपाने याबाबत ट्विट करून अनंत कुमार हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. हेगडे यांचं हे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागवलं आहे. भाजपाने नेहमी संविधानिक लोकहित आणि राष्ट्रीय हितासाठी काम केले आहे असं भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले.