पटना : बिहार मध्ये 2016 साली भाजपासोबत समझोता केला असता तर आज बिहारचा मुख्यमंत्री असतो आणि सुशील कुमार मोदी आमच्यासोबत सध्या ज्या पदावर आहेत, त्याच पदावर विराजमान असते. मात्र, आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही आणि करणारही नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले. बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
2016 मध्ये भाजपाने जदयूच्याआधी राजदला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जर राजदने तत्त्वांशी समझोता केला असता तर बिहारमधील राजकीय समीकरण वेगळेच असते, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच, राजद व भाजपाचे सरकार बनावे आणि मुख्यमंत्रीपद राजदच्या कोणताही नेत्याला द्यावे, अशी भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती. तसेच, या ऑफरमध्ये उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, धोरण आणि तत्वांवर चालणाऱ्या राजदने ही ऑफर धुडकावली, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
याचबरोबर, जे लोक सत्तेसाठी उत्सुक होते, त्यांनी धोरण आणि तत्व बाजूला सारून बिहारमध्ये सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती बिहारसारखीच आहे. हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कधीही धोरण आणि तत्त्वांशी समझोता केला नाही, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला. बिहारच्या वाईट स्थितीला नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी पूर्णपणे जबाबदार आहेत, असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.