पालमपूर - नोटाबंदीला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येत्या दिवसांत काँग्रेसकडे दु:ख व्यक्त करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. नोटाबंदी ही आवश्यक होती असा पुनरुच्चार करत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नोटाबंदीशी असलेले कनेक्शनही सांगितले. इंदिरा गांधी यांनी नोटाबंदी लागू करण्यास नकार दिला होता. पण जर योग्य वेळी नोटाबंदी झाली असती तर आम्हाला नोटाबंदी लागू करावी लागली नसती. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी भ्रष्टाचार हीच काँग्रेसची ओळख असल्याचा टोला लगावला होता. काँग्रेसला भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष असल्याचे सांगत मोदी म्हणाले, काँग्रेस आणि भ्रष्टाचार यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या खटल्यात जामिनावर असलेले मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याकडे इशारा करत मोदी म्हणाले, काँग्रेसचे नेते जामिनावर बाहेर आहेत आणि भ्रष्टाचारावर नजर ठेवण्याच्या बाता मारत आहेत. काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार खपवून घेण्यात येणार नसल्याचा उल्लेख केला आहे.
"हिमाचल आता परिवर्तनासाठी तयार आहे, लोकांना केवळ बदलच नको आहे. तर हिमाचल प्रदेशची लूट करणाऱ्यांना शिक्षा देण्याची त्यांची इच्छा आहे. माझे पुतळे जाळले जात आहेत. पण मला माझे पुतळे जाळले जाण्याची भीती नाही. पण भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहील."असे मोदींनी सांगितले.