नवी दिल्ली - पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मोजक्या नेत्यांना कृषी कायद्याविरोधी रॅलीसाठी भाजपशासित हरयाणा राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली. पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. देशातील विविध मुद्द्यांवर बोलताना, लडाख सीमारेषेवरील चीनच्या घुसखोरीवरुनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार हे शेतकरी, कामगार व गरिबविरोधी सरकार असून अदानी आणि अंबानींचं हित जोपसणारे असल्याची टाकीही राहुल यांनी केली. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश यांसह लडाख सीमारेषेवरील भारत-चीन वादावरही राहुल यांनी भाष्य केले. यावेळी, बोलताना चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केला असून मोदी सरकार गप्प असल्याचे ते म्हणाले. तसेच, देशात आजमित्तीला युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला नसता, असेही राहुल यांनी म्हटले.
कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान
"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.
मोर्चाला परवानगी नाकारली
हरयाणातील भाजप सरकारने सोमवारी म्हटले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी काही लोकांसोबत येऊ शकतात; परंतु राज्यातील वातावरण बिघडू शकते म्हणून पंजाबमधून मोठी गर्दी घेऊन आले तर परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही म्हटले होते की, राहुल गांधी यांना आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे; परंतु पंजाबमधून मोठ्या संख्येने लोक घेऊन आल्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, राहुल गांधींसमेवत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते; परंतु पिहोवा सीमेवरील टेकोर गावानजीक महामार्गावर तासभर शेती बचाव यात्रा रोखण्यात आली.