तर नरेंद्र मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का - मल्लिकार्जुन खर्गे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 09:12 AM2019-05-13T09:12:32+5:302019-05-13T09:14:53+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे.
बंगळुरू - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणतात काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत. जर काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकामध्ये स्वत:ला फाशी लावून घेणार आहेत का? अशी विचारणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
कर्नाटकमधील चिंचोली येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, इथे बसलेले लोक देशाचे भविष्य लिहिणार आहेत. सुभाष आणि आमचे भविष्य तुमच्या हातात आहे, मोदी जिथे जिथे जातात तिथे सांगतात की काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 40 जागासुद्धा मिळणार नाहीत. तुमच्यापैकी कुणाचा यावर विश्वास बसतो का. जर आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी दिल्लीतील विजय चौकात स्वत:तला फाशी लावून घेणार आहेत का?''
दरम्यान, भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी खर्गे यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली असून, या वक्तव्यासाठी खर्गे यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असा टोलाही शोभा करंदलाजे यांनी लगावला आहे.
कर्नाटकमधील चिंचोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. जाधव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी गुलबर्गा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवली आहे.