लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या विवाहित पुरुषांची प्रकरणे हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
अॅड. महेशकुमार तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीचा उल्लेख केला आहे. २०२१ मध्ये १,६४,०३३ लोकांनी आत्महत्या केल्या. यापैकी ८१,०६३ लोक विवाहित पुरुष होते, तर २८,६८० विवाहित महिला होत्या. ३३.२ टक्के पुरुषांनी कौटुंबिक समस्यांमुळे आणि ४.८ टक्के पुरुषांनी विवाहासंबंधी समस्यांमुळे जीवन संपविले. या वर्षात १,१८,९७९ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. हे प्रमाण ७२ टक्के आहे.
काय आहे मागणी?
- विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचा प्रश्न हाताळण्यासाठी आणि कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या पुरुषांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
- कौटुंबिक समस्या व विवाहाशी संबंधित समस्यांवर अभ्यास करण्यासाठी भारतीय कायदा आयोगाला निर्देश जारी करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"