अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे गेल्या आठ दिवसापासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, आज भारतीय माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने उद्योगपती गौतम अदानी यांच्या समर्थनात एक ट्विट केले. आता या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी विरेंद्र सेहवागला ट्रोल केले आहे.
'भारतीय शेअर बाजाराच्या सततच्या घसरणीमागे विदेशी शक्तींचे षडयंत्र आहे. गोरे लोक भारताची प्रगती सहन करू शकत नाहीत. भारताच्या शेअर बाजारावरील हा हल्ला म्हणजे सुनियोजित कट असल्याचे दिसते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण नेहमीप्रमाणे या वेळीही भारत मजबूत होईल, असं ट्विट विरेंद्र सेहवागने केले आहे. हे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून त्याला सुमारे 4000 वेळा रिट्विट करण्यात आले आहे.
या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी सेहवागला घेरले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सेहवागला अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. आता या गोर्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांना अदानीचे शेअर्स विकत घेऊन उत्तर द्या, असं नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
एकापाठोपाठ एक अनेक यूजर्सनी सेहवागला हाच सल्ला दिला. हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर, अदानी समूहाचे शेअर्स वेगाने घसरत राहिले. सोमवारीही अनेक शेअर्स 10% पेक्षा जास्त तोट्याने व्यवहार करत आहेत.