बंकुरा - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराला रंगत आली आहे. पश्चिम बंगालच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाकयुद्ध जोरदार रंगलेले दिसत आहे. ममता बॅनर्जी यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. यावर प्रत्युत्तर देत ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे.
कोळसा माफियांशी आमच्या पक्षातील कोणाचाही संबंध असल्याचा आरोप तुम्ही सिद्ध करा, हे खरं असलं तर मी माझे सर्व 42 उमेदवार मागे घेईन असं आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे की, आमच्या नेत्यांचे कोळसा माफियांशी सबंध आहेत. जर मोदी हे आरोप सिद्ध करु शकले तर लोकसभा निवडणुकीतून मी माझे 42 उमेदवार मागे घेईन." जर तुम्ही खोटं बोलला असाल तर तुम्हाला लोकांसमोर दोन्ही कान धरुन 100 उठा-बशा काढाव्या लागतील." असं त्यांनी सांगितले.
ममता आणि मोदी यांचं शाब्दिक युद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मागील आठवड्यात फनी या चक्रिवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. या वादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु ममता यांनी मोदींशी बोलणं टाळल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिली होती यावरुनही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लावत मी तुम्हाला पंतप्रधान मानत नाही आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला केंद्राची मदत नको अशी टीका केली होती.
तर बंकुरा येथील सभेत नरेंद्र मोदींनी मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप केला होता. तसेच ममता बॅनर्जी यांनी मला थप्पड मारण्याची भाषा केली होती, असा आरोप करून मोदी म्हणाले की, दीदींची थप्पड म्हणजे माझ्यासाठी आशीर्वादच असेल असा टोला ममता बॅनर्जी यांना लगावला होता.