लखनौ: निवडणुका आणि नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य, हे काही नवीन नाही. अनेकदा नेते वादग्रस्त वक्तव्ये करुन वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. अशाच प्रकारचे एक वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदाराने केले आहे. गोंडा जिल्ह्यातील सदर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले खासदार आणि भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मंचावरुन सपावर हल्ला चढवला. तसेच, सपाचे लोक जिन्नाच्या घराण्यातील आहेत, अशी टीका केली.
'...तर कापून टाकू'यावेळी त्यांनी मोदी आणि योगी सरकारचे कौतुक करताना कसाब आणि अफझलला सरकारमध्ये स्थान नाही, असे म्हटले. हे मोदींचे आणि योगींचे सरकार आहे. ज्या घरात अफजल निघेल त्याला मारून टाकू, असा या सरकारचा नारा आहे. तुम्ही कलाम झालात, तर आम्ही तुम्हाला डोक्यावर बसवू आणि कसाब झालात, तर आम्ही तुम्हाला कापून टाकू, असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.
काँग्रेसमध्ये घराणेशाहीते पुढे म्हणाले, राहुल गांधी स्वतःला राजकुमार समजतात, त्यामुळेच त्यांना मोदी पचनी पडत नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी काँग्रेसचे युवराज चांगले वागले नाहीत, तसेच मंत्रिमंडळातील नोटा फाडण्याचे कामही त्यांनी केले, असेही ते म्हणाले. त्याचवेळी घराणेशाहीचा खरपूस समाचार घेत खासदार म्हणाले की, मोतीलाल नेहरुंनीच घराणेशाही सुरू केली. मोतीलाल नेहरुंनी जवाहरलाल नेहरुंना राष्ट्रपती केले आणि नंतर हाच क्रम राहुल गांधींपर्यंत चालू राहिला. पण, राहुल गांधींना जिंकता आले नाही ही वेगळी बाब आहे, मात्र काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.