'काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:11 AM2019-03-15T06:11:32+5:302019-03-15T06:12:11+5:30
राहुल यांचे आश्वासन; मोदींसारखा मी खोटारडा नाही
थ्रिसूर : लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मी खोटी आश्वासने देत नाही असाही टोला त्यांनी लगावला.
केरळमधील त्रिप्रयार येथे अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसने आयोजिलेल्या राष्ट्रीय मच्छीमार संसद या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी सांगितले की, तुम्ही माझी भाषणे बारकाईने ऐकलीत तर लक्षात येईल की मी जे सांगतो ते करतो. एखादा निर्णय घेतला तर तो अंमलात आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या शब्दांवर ठाम राहतो.
राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील चेन्नई येथील स्टेला मॅरिस महिला महाविद्यालयामध्ये बुधवारी बोलताना असे आश्वासन दिले होते की, आम्ही सत्तेवर आल्यास संसदेत व विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात येईलच, पण सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आक्षण ठेवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. विविध प्रांतातील दुर्लक्षित घटकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे राहुल गांधी लोकसभा निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये सध्या विविध आश्वासनांची पेरणी करत आहेत.
उद्योगपतींकडेच लक्ष
राहुल गांधी मच्छीमारांच्या कार्यक्रमात म्हणाले की, शेतकरी, मच्छीमार, लघुउद्योजक यांच्याकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अनिल अंबानी, नीरव मोदीसारख्या बड्या उद्योगपतींच्या मागण्या मान्य करीत आहेत. या उद्योगपतींनी मागण्या केल्या की पंतप्रधान १० सेकंदांत पूर्ण करतात, असेही ते उपरोधिक शैलीत म्हणाले.