अजमेर - गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेल्या १२वीच्या विद्यार्थिनीला शाळेने बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. जर ती परीक्षेला बसली तर ‘वातावरण खराब होईल,’ असे शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितले, असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. मात्र शाळेने हा दावा फेटाळत ‘ती चार महिन्यांपासून शाळेत आलेली नव्हती, त्यामुळे तिला प्रवेशपत्र देण्यात आले नव्हते,’ असे म्हटले आहे.
विद्यार्थिनीने दुसऱ्या शाळेतील एका शिक्षिकेशी संपर्क साधल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी अजमेरच्या बालकल्याण आयोगाने (सीडब्ल्यूसी) गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
या विद्यार्थिनीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिचा नातेवाईक आणि अन्य दोघाजणांनी बलात्कार केला होता. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, शाळेने तिला घरून अभ्यास करण्यास सांगितले होते. ती शाळेत आल्याने ‘वातावरण बिघडू शकते,’ असे सांगण्यात आल्याने ती घरीच बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होती.
इतर विद्यार्थ्यांच्या पालकांचा आक्षेपइतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. ती तिचे प्रवेशपत्र घेण्यासाठी गेली तेव्हा तिला सांगण्यात आले की, ती आता शाळेची विद्यार्थिनी नाही. यामुळे ती निराश झाली आहे. ती एक हुशार विद्यार्थिनी असून, तिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवले होते, असे आयोगाच्या अध्यक्षा अंजली शर्मा यांनी सांगितले.