नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या तरतुदींचा पुन्हा विचार करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतरही, गेल्यावर्षी देशातील अनेक न्यायालयांनी १६५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या २० वर्षांतील एका वर्षात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली त्यामध्ये सर्वाधिक ५१.२ टक्के लैंगिक अत्याचारात दोषी आढळले आहेत.नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) दिल्लीच्या गुन्हेगारी सुधारणा वकील गट प्रोजेक्ट ३९-ए जारी केलेल्या सातव्या ‘भारतात मृत्युदंड : वार्षिक सांख्यिकी अहवाला’मध्ये ही बाब समोर आली आहे.
वाढती संख्या अहवालानुसार, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील एकाच प्रकरणामुळे ३८ कैद्यांना एकत्रितपणे फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने वर्षभरात सर्वाधिक कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते.
२००४ नंतर फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.
मोठ्या कोर्टांमध्ये ७९ खटलेसर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांमधील फाशीच्या शिक्षेची प्रकरणे निकाली काढण्याबाबत अहवाल सांगतो की, गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने ११, तर उच्च न्यायालयांनी ६८ खटले निकाली काढले. उच्च न्यायालयांनी चार प्रकरणांमध्ये मृत्युदंड शिक्षा जाहीर केली. ३९ प्रकरणांमध्ये ५१ कैद्यांची शिक्षा कमी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयानेही दरोडा प्रकरणाच्या एका खटल्यात जन्मठेपेची शिक्षा फाशीत बदलली होती.